To Start Second and third shift in ITI for minorities (Maharashtra)
देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे.
तसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.
याकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. सध्या मुंबईमध्ये मांडवी (डोंगरी) व चांदिवली येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. मांडवी येथील केंद्राच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून तेथे पुढील शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या या संस्थेचे वर्ग सेंट झेवियर्स टेक्नीकल स्कूल येथे चालविण्यात येत आहेत. तसेच चांदिवली येथील केंद्राकरीता जागा अद्याप ताब्यात यावयाची असल्यामुळे त्या संस्थेचे वर्ग मुलुंड येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात चालविण्यात येत आहेत. मुंब्रा,जि.ठाणे येथे देखील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याकरिता आवश्यक ती जागा प्राप्त करण्यात आली आहे. या जागेवर लवकरच बांधकाम सरु करण्यात येऊन पुढील एका वर्षात तेथे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे.
Source
https://mdd.maharashtra.gov.in/
Advertise